इस्लामाबाद : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला चीन पुन्हा एकदा १.३ अब्ज डॉलरचे कर्ज देत आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने (आयसीबीसी) या कर्जाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे पाकचा घसरत चाललेला परकीय चलन साठा वाढण्यास मदत होईल. मात्र, आम्ही कधीही गरीब नव्हतो व कधीच राहणार नाही. चीनचे कर्ज फेडण्यासाठी आम्ही १.३ अब्ज डॉलर परत केले. आमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच चीन आम्हाला हा पैसा परत देत आहे. याआधीदेखील चीनने आम्हाला परकीय चलनाचा साठा वाढविण्यासाठी ०.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे, असे दार म्हणाले.
आयएमएफने पाकला बेलआउट पॅकेजअंतर्गत सहा अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दोघांत करार झाल्यास आयएमएफ २०१९ मध्ये निश्चित केलेल्या ६.५ अब्ज डाॅलरच्या बेलआउट पॅकेजअंतर्गत पाकिस्तानला सुमारे एक अब्ज डॉलर्सची रक्कम देईल. (वृत्तसंस्था)
पाकला पाच अब्ज डॉलरची आवश्यकतापाकला जूनमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात आपली आर्थिक दरी दूर करण्यासाठी पाच अब्ज डॉलरच्या परदेशी साहाय्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (आयएमएफ) करार झाल्यानंतरच त्याला आणखी निधी मिळू शकेल. दार यांच्या मते करारावर पुढील आठवड्यापर्यंत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.