लाहोर : कराचीमध्ये मागील महिन्यात झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त पथकाची स्थापना केली आहे. या अपघातात ९८ जण मृत्युमुखी पडले होते.शुक्रवारी स्थापन करण्यात आलेल्या या पथकात संघीय तपास संस्थेचे (एफआयए) अधिकारी सहभागी असतील. ते पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमान दुर्घटनेची चौकशी करतील.एफआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एफआयए लाहोरचे अतिरिक्त संचालक इम्रान याकूब यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय संयुक्त पथकाला सर्वोच्च प्राथमिकतेच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी करण्यास तसेच लवकरात लवकर सरकारला अहवाल सोपवण्यास सांगण्यात आले आहे. विमान दुर्घटना व चौकशी मंडळाच्या चार सदस्यीय पथकाने यापूर्वीच या अपघाताची चौकशी केलेली आहे.याशिवाय फ्रान्सच्या एका पथकानेही स्वतंत्र चौकशी केलेली आहे व घटनास्थळाहून पुरावे गोळा केलेले आहेत. पाकिस्तान सरकारने सांगितले की, एएआयबी पथकाचा प्राथमिक अहवाल २२ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पीआयएचे एक विमान २२ मे रोजी कराचीच्या जिना आंतरराष्टÑीय विमानतळाजवळील भरवस्तीवर कोसळले होते. यात त्यातील ९९ पैकी ९७ जण ठार झाले होते. दोन प्रवासी बचावले होते. या अपघातात जखमी झालेल्या १३ वर्षीय बालिकेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाककडून संयुक्त पथकाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 2:35 AM