इस्लामाबाद-पाकिस्तानची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. परकीय चलनात झालेली घट आणि वाढत्या कर्जामुळे पाकिस्तानात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची वेळ आली आहे. यातच पाकिस्तानने यूएईकडे कर्ज मागितले आहे. हे कर्ज मागताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना लाट वाटत होती, असे ते स्वतः एका व्हिडिओत म्हणत आहेत.
शाहबाज शरीफ आठवडाभरापूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यांनी जिनिव्हा येथील हवामान शिखर परिषदेत भाग घेतला होता. त्यानंतर ते सौदी अरेबिया आणि यूएईला गेले. तिन्ही ठिकाणी त्यांनी कर्ज मागितले. सौदीने 2 आणि UAE ने 1 बिलियन डॉलर देण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
काय म्हणाले शरीफ- शाहबाज शरीफ यांच्यानुसार, यूएई दौऱ्यावर असताना देशासाठी कर्ज मागताना ते अतिशय मानसिक तणावात होते. ते म्हणाले की, पाकिस्तानचा वझीर-ए-आझम म्हणून मला यूएईमध्ये ज्या गोष्टींना सामोरे जावे लागले, त्या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तिथे मला खूप त्रास सहन करावा लागला. मला त्यावेळेस खूप लाज वाटली होती, पण देशासाठी कर्ज मागितले, असेही शरीफ म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तेथील अध्यक्ष आणि माझे मोठे भाऊ मोहम्मद बिन झायेद यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले. आधी मी ठरवलं होतं की त्यांच्याकडून कर्ज मागणार नाही, पण नंतर शेवटच्या क्षणी कर्ज मागायचं धाडस केलं. मी त्यांना म्हणालो- सर, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, मला खूप लाज वाटतीये, पण मी खूप लाचार आहे. तुम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती आहे. तुम्ही मला आणखी एक अब्ज डॉलर्स द्या, असं शरीफ व्हिडिओत म्हणत आहेत.
सैन्यासमोर रडले- गेल्या आठवड्यात शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराच्या पासिंग आऊट परेड समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तेव्हाही ते देशाच्या कर्जासाठी रडले होते. लष्कर आणि आयएसआय प्रमुखांसह राष्ट्रपती आरिफ अल्वीही येथे उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांच्यासमोर शाहबाज शरीफ यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात होते, कारण पाकिस्तानच्या एकूण बजेटचा सर्वात मोठा हिस्सा लष्करावर खर्च होतो आणि दरवर्षी त्यात 10% वाढ होते.
शरीफ परेडमध्ये म्हणाले होते की, प्रत्येकवेळी कर्ज मागावं लागत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानात अणुशक्ती असल्यामुळे हे अधिक वाईट दिसतय. देश म्हणून आपण कधीपर्यंत कर्जावर अवलंबून राहणार आहोत. देश चालवण्याचा हा योग्य मार्ग नाही आणि अशा प्रकारे आपण देशाला योग्य दिशेने नेऊ शकत नाही. आज नाही तर उद्या हे कर्ज परत करावं लागणार आहे, याचाही विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले होते.