वॉशिंग्टन : पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांवर त्या देशाने कारवाई करावी, असे आवाहन अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांची गुरुवारी व्हॉईट हाऊसमध्ये प्रथमच भेट झाली. या भेटीत हॅरिस यांनी स्वत:हून दहशतवादातील पाकिस्तानचा उल्लेख केला. हॅरिस यांनी त्या देशात (पाकिस्तान) दहशतवादी गट सक्रिय असून, अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांच्यावर त्याने कारवाई करावी, असे म्हटले. यावेळी उभय नेत्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यूहरचनात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि लोकशाहीला धोका, अफगाणिस्तान आणि भारत-पॅसिफिकसह समान हिताच्या जागतिक विषयावर चर्चा केली.चर्चेत दहशतवादाचा विषय निघाल्यावर कमला हॅरिस यांनी त्यातील पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. हॅरिस-मोदी चर्चेत दहशतवादी कारवायांतील पाकिस्तानच्या भूमिकेचा विषय निघाला का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.श्रिंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅरिस म्हणाल्या की, “पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट सक्रिय आहेत. या गटांवर पाकिस्तानने कारवाई करावी. ती झाल्यास अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.” भारताच्या सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि अनेक दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी चर्चेत केलेल्या उल्लेखाशी सहमती दर्शवताना हॅरिस म्हणाल्या की, “आम्ही दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या असलेल्या पाठिंब्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”अमेरिका आणि भारत देशातील जनतेच्या हितासाठी लोकशाहीचे रक्षण करणे हे दोन्ही देशांचे कर्तव्य असल्याचे कमला हॅरिस म्हणाल्या.
जपानच्या पंतप्रधानांसोबत संवाद -दक्षिण चीन समुद्रातील आर्थिक दबाव आणि आहे ती परिस्थिती जबरदस्तीने बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांचा या दोन्ही नेत्यांनी कठोर विरोध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्दिपक्षीय संबंधांची समीक्षा केली. अफगाणिस्तानसह जागतिक घटनाक्रमावर चर्चा केली.
स्वतंत्र, खुल्या हिंद - प्रशांत महासागरासाठी कटिबद्ध असल्याचेही या नेत्यांनी स्पष्ट केले. व्दिपक्षीय सुरक्षा, संरक्षण उपकरण आणि तंत्रज्ञानासह संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत सहमती झाली.