वॉशिंग्टन : पठाणकोट हल्लाप्रकरणी पाकिस्तान हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करील, अशी अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कारवाई करताना अतिरेकी संघटनांत भेदभाव करणार नाही, असा शब्द पाकिस्तानने दिला असून, पाकने आता आपला शब्द पाळावा, असे आवाहनही अमेरिकेने केले आहे. यासंदर्भात बोलताना किर्बी यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने याबाबत चर्चा केली आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की, पाकिस्तान दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई करील. दरम्यान, भारताकडून दिल्या गेलेल्या पुराव्यांवर पाकिस्तान तपास करीत आहे, असे स्पष्टीकरण पाककडून आल्यानंतर काही तासांतच अमेरिकेकडून ही प्रतिक्रिया आली आहे, हे विशेष. किर्बी म्हणाले की, आम्ही हे पूर्वीपासून सांगत आलो आहोत की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात अतिरेक्यांना आश्रय देणारी निश्चित काही ठिकाणे आहेत. ही ठिकाणे नष्ट झाली पाहिजेत, असे आमचे स्पष्ट मत आहे. (वृत्तसंस्था)
पाककडून कारवाई व्हावी -अमेरिका
By admin | Published: January 05, 2016 11:32 PM