पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील टांडो अल्लायार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवले जात आहे. बिटर विंटरच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानात मानवाधिकार संघटना आणि कार्यकर्त्यांनी रितू (बदललेले नाव) नावाच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाकडे लक्ष आकर्षित केले आहे.
टांडो अल्लायार जिल्ह्यात शेख भिरकिओ गावातील 6 वर्षांच्या अल्पसंख्याक हिंदू चिमुकलीवर 23 वर्षांच्या दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. संबंधित पीडित चिमुकली रितू घराबाहेर खेळत असताना हा प्रकार घडला. यानंतर ती तिच्या घरापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर बुशुद्धावस्थेत आढळून आली.
पोलिसांनी मदतच केली नाही -यानंतर, स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रितूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन सुस्त आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासनही दिले नाही.
बिटर विंटरच्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील शेख भिरकियोमध्ये नेहमीच अल्पसंख्याकांना टारगेट केले जाते. हे गाव अनेक वेळा सांप्रदायिक हिंसाचाराचे केंद्रही राहिले आहे.
हिंदूं अल्पसंख्याकांचा घरावर हल्ला -याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात काही गुंडांनी निलो कोल्ही नावाच्या एका व्यक्तीच्या घरावर लाठ्या-काठ्या आणि बंदुकीसह हल्ला केला होता. बिटर विंटरच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात निलो कोल्ही यांची मुलगी सुधी गंभीर जखमी झाली होती. यानंतर घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली, असे निलो कोल्ही यांनी म्हटले आहे.
शेख भिरकियोमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती तिच्या घराबाहेर कपडे धूत होती. तिच्यावर धर्मांतरासाठी आणि लग्न करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले.