पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या शिवाय तेथे अन्न धान्याचे संकटही निर्माण झाले आहे. तेथील गरिबीने ग्रासलेल्या सर्वसामान्य जनतेवर अक्षरशः उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. रेशनसाठी लोक इकडे तिकडे भटकताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी मोफत रेशन वितरण मोहिमेदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात महिला आणि मुलांसह किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच, अनेक जण जखमीही झाले आहेत. रेशन वितरण केंद्रात झालेल्या या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूजने म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना कराचीच्या SITE (सिंध इंडस्ट्रियल ट्रेडिंग इस्टेट) परिसरात घडली. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान सरकारने कराचीमध्ये मोफत रेशन वितरण मोहीम सुरू केल्यानंतर, येथील सरकारी वितरण केंद्रावर लोकांची मोठी गर्दी केली होती. यानंतर हा प्रकार घडला. यापूर्वी, गेल्या आठवड्यात पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतात मोफत पीठ वितरण केले होते. त्यावेळीही अशाच प्रकारची चेंगराचेंगरी झाली होती. त्यात चार वृद्धांचा मृत्यू झाला होता.
आजची ही घटना वगळता, पाकिस्तानातील इतर प्रातांमध्ये गेल्या काही आठवड्यांत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमीही झाले आहेत. एवढेच नाही, तर ट्रक आणि वितरण केंद्रांवरून पिठाच्या हजारो गोण्या लुटण्यात आल्याचेही न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या हवाल्याने म्हण्यात आले आहे.