इस्लामाबाद - आर्थिक संकटात सापडलेल्या आणि अंतर्गत दहशतावादाशी झुंजणा-या पाकिस्तानने आता चीनसमोर मदतीसाठी हात पसरले आहेत. यावेळेस पाकिस्तानने चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाकडे 500 दशलक्ष रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतले आहे. बेसुमार वाढलेले आर्थिक प्रश्न आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला पाकिस्तानी रुपया यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
त्यामुळेच पाकिस्तानी रुपया सुदृढ होण्यासाठी हे कर्ज घेण्याचा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागला आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने 15 जानेवारी रोजी चीनकडून हे कर्ज 4.5 टक्के व्याजदराने घेण्याचा निर्णय घेतला. या आर्थिक वर्षाच्या गेल्या सात महिन्यांमध्ये पाकिस्तानने एकूण 6.6 अब्ज डॉलर्सचे परदेशी संस्थांचे कर्ज घेतले आहे. जून महिन्यात दिलेल्या मंजुरीनंतर पाकिस्तानच्या एकूण बजेट एस्टीमेटच्या 86 % वाटा परदेशी देण्यांचा झालेला होता. यामुळे सलग दुस-या वर्षीही पाकिस्तानच्या कर्जांचा आकडा 10 अब्ज डॉलर्सच्या वर जाणार आहे. यामध्ये चीनचा वाटा 1.6 अब्ज डॉलर्स इतका आहे .
चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँकेकडून पाकिस्तानने कर्ज घेण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही पाकिस्तानने या बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले .