पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले आणि त्यांनी अधाधुंग गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शाहराह-ए-फैसल भागात हा हल्ला झाला. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती सिंध पोलिसांच्या आयजींनी दिली. पाकिस्तानच्या एआरव्हाय न्यूजच्या वृत्तानुसार, कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या या दहशतवाद्यांकडे प्रचंड स्फोटके आणि शस्त्रे आहेत, ज्यांच्या मदतीने ते सतत हल्ले करत असल्याची माहितीही एआरव्हाय न्यूजनं दिली.
वृत्तानुसार, कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या या दहशतवाद्यांकडे हँडग्रेनेड आणि ऑटोमॅटिक गन आहेत. पाकिस्तान रेंजर्स आणि पोलीस दलांनी एआयजी कार्यालयाजवळील परिसराची नाकेबंदी केली आहे. केपीओजवळ सिंध पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्स मोठ्या संख्येने तैनात आहेत. पाकिस्तानी रेंजर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, क्विक रिस्पॉन्स फोर्स घटनास्थळी पोहोचली आहे आणि त्यांनी परिसराला वेढा घातला आहे.