वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला. मर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. पाकिस्तानला अनेकदा हॉटलाईनवरुन चर्चा करुन गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. इतके सर्व झाल्यानंतरही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजिबात कमी झालेली नाही.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईककरुन आमच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केले तर, भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे काही घडल्यास कोणीही पाकिस्तानकडून आत्मसंयम ठेवण्याची अपेक्षा बाळगू नये अशी मुक्ताफळे असिफ यांनी उधळली आहेत. ख्वाजा असिफ सध्या अमेरिका दौ-यावर आहेत. तिथून बोलताना त्यांनी भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
केंद्र सरकारने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला तर, पाकिस्तानात घुसून त्यांचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असे हवाई दल प्रमुख धानोआ यांनी सांगितले होते. पाकिस्तानातील अणवस्त्राचे तळ शोधून तिथे हल्ला करु शकते असे धानोआ म्हणाले होते. पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये असताना भारताविरोधात अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली होती. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले होते.
दोन्ही आघाडयांवर लढण्यास सक्षमभारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे असे बी.एस.धानोआ यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे ते म्हणाले.