दहशतवाद्यांना पैसे पुरविणे आणि मनी लाँड्रिंगवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्याने पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे पाकिस्तानी तज्ज्ञांची 20 जणांची टीम जगावर लक्ष ठेवणाऱ्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) चे मन वळविण्यासाठी बँकॉकला रवाना झाली आहे.
एका वृत्तानुसार रविवारी पाकिस्तान एफएटीएफला मनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले. पाकिस्तानला आधीच ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी 13 ते 18 ऑक्टोबर यावेळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळूच सरकली असून द एक्स्प्रेस ट्रिब्यूननुसार रविवारी पाकिस्तानचे मंत्री हम्माद अजहर यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांची टीम बँकॉकला रवाना झाली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विविध खात्यांचे अधिकारी सहभागी आहेत.
एफएटीएफसोबत सोमवारपासून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. ही चर्चा 13 सप्टेंबरपर्यंत चालण्याची शक्यता पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमध्येच ठेवायचे की ब्लॅकलिस्टमध्ये याबाबत निर्णय होईल.
एफएटीएफचा आशिया-प्रशांत गटाने केले आधीच ब्लॅकलिस्टएफएटीएफच्या आशिया-प्रशांत गटाने आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. यामुळे पाकिस्तानला दर तिमाहीला या गटाला अहवाल द्यावा लागत आहे. तसेच त्यांना 125 प्रश्न विचारले आहेत. यांची उत्तरेही एफएटीएफच्या आजच्या बैठकीत द्यावी लागणार आहेत.