Pakistan Toshakhana Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी यांना उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:21 AM2024-04-02T11:21:38+5:302024-04-02T11:22:18+5:30
Imran Khan wife Bushra Bibi Pakistan: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनएबी कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
Pakistan Toshakhana Case, Imran Khan Bushra Bibi Pakistan High Court: इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला. उच्च न्यायालयानेपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावण्यात आलेल्या १४ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी ईदच्या सुटीनंतर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या NAB न्यायालयाने या दोघांना ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर दोघांनाही लग्नासंबंधित खटल्यात स्वतंत्रपणे सात-सात वर्षांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने सुनावली होती शिक्षा
याआधी, गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने इम्रान आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही देशाची काही गोपनीय कागदपत्रे आणि माहितीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, डिसेंबरमध्ये, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने सौदी क्राउन प्रिन्सकडून मिळालेल्या दागिन्यांचा सेट बाबत नवीन केस दाखल करून घेतली होती.
इम्रान खान आणि बुशरा बीबीला मिळाली होती १०८ गिफ्ट!
इस्लामाबादच्या NAB ने इम्रान आणि त्याच्या पत्नीला दोषी ठरवले होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला विविध राष्ट्रप्रमुख आणि परदेशी मान्यवरांकडून १०८ भेटवस्तू मिळाल्याचा आरोप आहे. या निर्णयानुसार, इम्रान खान आणि त्यांची पत्नी १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद भूषवू शकणार नाहीत आणि दोघांनाही ७८७ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमेर फारूक म्हणाले की, शिक्षेविरोधातील अपीलवरील सुनावणी ईदच्या सुटीनंतर होणार आहे.