पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) दहशतवाद्यांनी शेकडो प्रवासी प्रवास करत असलेल्या जाफर एक्स्प्रेसचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच बीएलएने या अपहरणाबाबत एक पत्रक प्रसिद्ध करून जर आपल्याविरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई केली गेली तर ओलिस धरलेल्या सर्वांची हत्या केली जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, आता दहशतवाद्यांनी या ट्रेनचं अपहरण नेमकं कसं केलं, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत अपहरणकांडाबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना घेऊन जाणारी ही ट्रेन बोलान भागातील एका बोगद्यातून जात असताना दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि ट्रेन थांबवली. त्यानंतर ८ बंदुकधारी हल्लेखोरांनी ट्रेनवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला. तर सुमारे सहा जवान मृत्युमुखी पडल्याचंही प्राथमिक वृत्त आहे. त्यानंतर या हल्लेखोरांनी संपूर्ण ट्रेनवर ताबा मिळवत प्रवाशांना ओलीस धरले.
या अपहरणकांडानंतर बलुचिस्तान सरकारने सर्व आपातकालीन उपाय करण्याचे आणि सर्व संस्थांना सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच लष्करालाही सतर्कतेचे आदेश देण्या आले आहेत. तर जनतेला शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र ज्या प्रकारे लष्कराचे सैनिक आणि आयएसआयचे अधिकारी अपहरण झालेल्या ट्रेनमध्ये असल्याने पाकिस्तानी लष्कराची चिंता वाढली आहे. तसेच सरकारसमोरील अडचणीही वाढल्या आहेत.
दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीने अपहरण करण्यात आलेल्या ट्रेनबाबत सांगितले की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे. आतापर्यंत सहा जवान शहीद झाले असून, शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. बीएलएचे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत.