Pakistan Violence, Terrorists Killed Policemen Kidnapped: पाकिस्तानातील असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात रात्री उशिरा दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान झालेल्या रक्तरंजित चकमकीत किमान नऊ दहशतवादी आणि आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाले. गुप्तचर विभागाच्या आधारावर दिलेल्या माहितीवरुन, खैबर जिल्ह्यातील तिराह मैदान खोऱ्यात हे ऑपरेशन केले गेले. यामध्ये लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेचे दोन महत्त्वाचे कमांडर मारले गेल्याचेही वृत्त आहे. यासमवेत कारवाईत एकूण सात सुरक्षा जवान आणि नऊ दहशतवादी जखमी झाले आहेत. अनेक तास चाललेल्या या कारवाईत जिल्ह्यातील तीन ठिकाणी जवान तैनात होते. चकमकीत आसपासच्या भागातील काही रहिवासीही जखमी झाल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आले.
७ पोलिसांचे अपहरण
बन्नू जिल्ह्यातील वजीर उपविभागाच्या रोजा चेक पोस्टवरून खैबर पख्तुनख्वा पोलिस युनिटच्या ७ पोलिसांचे सशस्त्र हल्लेखोरांनी अपहरण केले. सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्याकडील सर्व शस्त्रे, दारूगोळा व इतर सामग्रीही पळवून नेली.
चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या अशांत असलेल्या वायव्य प्रांतात खैबर पख्तूनख्वामध्ये शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचा एक कमांडो आणि सहा दहशतवादी ठार झाले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर जिल्ह्यातील तिराह व्हॅलीच्या लुर मौदान भागात ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेत पाकिस्तानी लष्कराचा एक कमांडो मारला गेला तर दुसरा कमांडो जखमी झाला. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी किमान सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिसरातून जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे आवाज येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या भागात सक्रिय असून त्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत अनेक हल्ले केले. परिणामी एकूण नऊ दहशतवादी आणि ७ सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला.