ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. लाल शाहबाज कलंदर येथे गुरुवारी आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात १00 भाविक ठार, तर २५० हून अधिक जखमी झाले होते. लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतानाही या आठवड्यात देशात अनेक हल्ले झाले. सुफी दर्ग्यावरील हल्ला सर्वात घातक होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 'देशात सांडलेल्या रक्ताच्या थेंबा थेबाचा हिशेब घेतला जाईल. आता संयम बाळगणार नाही', असं म्हटलं होतं.
पाकिस्तान लष्कराने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरदेखील सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. लष्कराने तेथेदेखील काही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातदेखील 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पेशावरमधील रेगी परिसरात एका सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान सीमारेषेलगत असलेल्या चेकपोस्टवरही दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत चार दहशतवादी ठार करण्यात आले.
13 फेब्रुवारीनंतर पाकिस्तानमध्ये एकूण आठ दहशतवादी हल्ले झाले आहेत. सोमवारी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले होते. त्याचदिवशी बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येदेखील स्फोट झाला होता. मंगळवारी क्वेटामध्ये बॉम्ब निकामी करत असताना पथकातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान नेहमी चांगलं आणि वाईट तालिबान असा फरक करत आला आहे. तसंच भारत आणि अफगाणिस्तानात होणा-या दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोप अफगाणिस्तान सुरुवातीपासून करत आला आहे.
पाकिस्तान लष्कराने पाक-अफगाण सीमेजवळील शालमान भागात मोहीम सुरू केली असून, यात तोफांचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून पाक-अफगाण सीमा तोखराम येथे बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाकमध्ये एकापाठोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकापाठोपाठ कारवाई सुरू केली. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी उच्चपदस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सहमती दर्शविली होती. सुफी दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने आपल्या आमाक या वृत्तसंस्थेद्वारे स्वीकारली होती.