नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानचे संबंध उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असेही शरीफ म्हणाले. शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे. नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, भारताला पाकिस्तानशी विधायक संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया रोखण्याची गरज आहे. दहशतवादापासून आपला परिसर मुक्त असावा. तिथे शांतता व स्थैर्य नांदावे, अशी भारताची इच्छा आहे. विकास साधण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती.शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे हे सारेजण जाणतात. दोन्ही देशांच्या जनतेची सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करूया, असेही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सर्जिकल स्ट्राईकनंतर तणाव वाढलापुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत फेब्रुवारी २०१९मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांत आणखी तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताने ऑगस्ट २०१९मध्ये रद्द केला. त्या निर्णयाचा पाकिस्तानने निषेध केला होता.