नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतीय क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे याबद्दल तक्रार केली आहे. क्षेपणास्त्र प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे.
भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर कोसळल्यानंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान तितक्याच क्षमतेचं क्षेपणास्त्र डागणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. त्यामुळे क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय पाकिस्तानकडून रद्द करण्यात आला.
भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागलं जाणार होतं. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान ही कारवाई करणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याचे संकेत तपासातून मिळाले. त्यानंतर पाकिस्ताननं आपला निर्णय बदलला आणि पुढील अनर्थ टळला. ब्लूमबर्गनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
भारताचं एक क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात कोसळलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही रहिवासी इमारतींचं नुकसान झालं. भारतानं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. नियमित देखभाल केली जात असताना चुकून क्षेपणास्त्र डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. या घटनेच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.