ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 26 - सक्तीने धर्मांतर करणे गुन्हा ठरविणारे नुकतेच संमत झालेले विधेयक सिंध सरकारने रद्द केल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पडण्याला तोंड द्यावे लागू शकते, असे अल्पसंख्य हिंदू लोकप्रतिनिधीने म्हटले. पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे आश्रयदाते व सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीगचे (एन) नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य डॉ. रमेश कुमार वांकवाणी यांनी सिंध क्रिमिनल लॉ (अल्पसंख्याकांचे संरक्षण) विधेयक, २०१५ मध्ये बदल करण्याचा किंवा ते रद्दच करण्याच्या सिंध प्रांताच्या हालचालींबद्दल गंभीर काळजी व्यक्त केली. ‘अतिरेकी धार्मिक पक्षांच्या’ दडपणामुळे विधेयक रद्द केले गेल्यास मुस्लिमेतरांमध्ये अत्यंत असुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला, असे वृत्त सोमवारी ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. विधेयक जर रद्द झाले तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळे पडण्याला तोंड द्यावे लागू शकते, अशी ताकीद त्यांनी दिली. अल्पसंख्य हिंदूंच्या कमी वयाच्या मुलींचे अपहरण आणि त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याच्या वाढत्या तक्रारी दूर करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. वांकवाणी यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या धर्माचा खोलवर अभ्यास करून किंवा उपदेशातून होणाऱ्या धर्मांतरास आमचा विरोध नाही. परंतु सक्तीने होणारे धर्मांतर आमच्या काळजीचा विषय आहे. रमेश कुमार वांकवाणी यांनी या कायद्याचा धार्मिक पक्षांनी केलेला विरोध हा ‘अन्यायकारक’ असल्याचे म्हटले. सिंध प्रांतातील अल्पवयीन मुलींच का धर्म बदलताहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. अल्पसंख्य विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती १६ डिसेंबर रोजी संसदीय कामकाजमंत्री निसार अहमद खुहरो यांनी दिली. ते म्हणाले, राज्यपालांनी त्याला मान्यता देवो किंवा न देवो विधेयकावर फेरविचार होऊन विधिमंडळ त्यात दुरुस्ती करील. सिंध विधिमंडळाने गेल्या महिन्यात सक्तीच्या धर्मांतराविरोधात हे विधेयक संमत केले असून, असे धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना किंवा त्याला साह्य करणाऱ्यांना अनुक्रमे पाच व तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे. सिंध प्रांतातील विविध भागांत सक्तीने धर्मांतराच्या घटना नियमित घडत असतात. साऊथ अशिया पार्टनरशिप-पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी पाकिस्तानात किमान एक हजार मुलींचे (त्यातील बहुसंख्य हिंदू) सक्तीने धर्मांतर केले जाते.