नवी दिल्ली – ज्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्ताननेतालिबानविरोधात मोहरा म्हणून वापरला आता त्या हक्कानीची इच्छा वाढली आहे. अफगाणिस्तानची सत्ता हक्कानीच्या हाती राहावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत होतं. परंतु त्यापेक्षा मोठी बातमी समोर आली आहे. हक्कानीची नजर पाकिस्तानच्या त्या भागांवर पडली आहे. ज्याठिकाणी पश्तून बहुल भाग जास्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डूरंड लाइनच्या पलीकडे पाकिस्तानात असलेल्या वजीरिस्तान हा पहिला भाग आहे. जिथे पश्तून बहुल भाग आहे. हा प्रदेश अफगाणिस्तानात शामिल करण्यासाठी हक्कानी प्रयत्नशील आहे.
जर तालिबानी(Taliban) अमेरिकन सैन्याशी लढून अफगाणिस्तानची(Afghanistan) सत्ता मिळवू शकतं तर पाकिस्तानकडून त्यांचा भाग हिसकावून घेणं ही मोठी गोष्ट नाही असं हक्कानी याला वाटत आहे. हक्कानीची इच्छा यासाठी मोठी आहे कारण वजीरिस्तान इथं त्याची पकड मजबूत आहे. तिथे पश्तून लोकसंख्या जास्त आहे. जी कुठे ना कुठे हक्कानी नेटवर्कचं समर्थन करते. येणाऱ्या काळात पाकिस्तान आणि हक्कानी यांच्यात हिंसाचार घडणं निश्चित आहे असा दावा सूत्रांनी केला आहे.
डूरंड लाइन हे वादाचं मूळ कारण
अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारने आणि तालिबाननेही डूरंड लाइनचा विरोध कायम केला आहे. डूरंड लाइन ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या(Pakistan) सीमांचं विभाजन करतं. पश्तून लोकसंख्येने डूरंड लाइन कधीही मानली नाही कारण या सीमेच्या दोन्ही बाजूला पश्तून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे ही मोठी समस्या आहे. अफगाणिस्तानातील पश्तून मानतात की, डूरंड लाइन ओढून ब्रिटनने पश्तूनांच्या घरदारं मनमानी पद्धतीने विभागली आहेत. अनेक वर्षापासून पश्तून डूरंड लाइनला मान्यता देत नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानची सत्ता कुणाकडेही असो डूरंड लाइनला कुणीही मान्यता देणार नाही.
हक्कानी आणि पाकिस्तानमध्ये सर्वकाही ठीक नाही
जोपर्यंत अफगाणिस्तानात सरकारचं गठन होत नाही तोवर हक्कानी गप्प राहील. परंतु पाकिस्तान आणि हक्कानी यांच्यात वाद सुरु झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सत्ताधारी आणि हक्कानी यांच्यात डूरंड लाइनवरुन चर्चा सुरु झाली आहे. वजीरिस्तान अफगाणिस्तानात आणावं अशी हक्कानीची इच्छा आहे. ही गोष्ट ऐकताच पाकिस्तानी राज्यकर्त्यांची झोप उडाली. हक्कानी पाकिस्तानात दखल देणार नाही याच तडजोडीवरुन पाकिस्तान पूर्ण ताकदीनं हक्कानी नेटवर्कला अफगाणिस्तानची सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न करत होती. परंतु ज्या दिवशी हक्कानी अफगाणिस्तानची सत्ता मिळवेल तेव्हा पाकिस्तानात खुनी खेळ सुरू होईल असं तज्त्रांना वाटतं.
पाकिस्तानसाठी हक्कानी बनणार भस्मासूर
हक्कानी नेटवर्कला पाकिस्ताननं पोसलं हे सर्वांपासून लपून राहिलं नाही. हक्कानीला तालिबानविरोधात उभं केले. हक्कानी तालिबानवर भारी पडत आहे त्याचं कारण पाकिस्तान आहे. हक्कानीच्या माध्यमातून तालिबानवर नियंत्रण ठेऊ असं पाकिस्तानला वाटत होतं. अफगाणी जमिनीचा वापर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाईल परंतु तालिबानने त्यास स्पष्ट नकार दिला आहे. परंतु त्याच दरम्यान वजीरिस्तान वाद पुढे आल्याने हक्कानी नेटवर्क पाकिस्तानसाठी भस्मासूर बनण्यास उशीर होणार नाही. पुढील २-३ महिन्यात हक्कानीचे दहशतवादी पाकिस्तानात हल्ला घडवतील याबाबतही शक्यता वर्तवली जात आहे.
डूरंड लाइनचा इतिहास
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेला जग डूरंड लाइन म्हणून ओळखतं. १२ नोव्हेंबर १८९३ रोजी ब्रिटीश सिविल सर्वंट सर हेनरी मोर्टिमर डूरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्या डूरंड रेषा यावर करार झाला. हा करार झाला असला तरी पश्तून लोकांनी कधीही या लाइनला महत्त्व दिलं नाही. ही ब्रिटन आणि सोवियत संघाचं षडयंत्र असल्याचं पश्तून यांना वाटत होते. कारण या रेषेमुळे पश्तून भागाची विभागणी करुन दोन वेगवेगळ्या देशाचा भाग बनवलं होतं. आता ही डूरंड लाइन पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकते.