वॉशिंग्टन : येत्या दहा वर्षांत पाकिस्तान जगातील तिसरा सर्वात मोठा अण्वस्त्रधारी देश होऊ शकतो. अमेरिकी तज्ज्ञांच्या एका अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्टिमसन सेंटर आणि कार्नेजी एंडॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे दोन तज्ज्ञ टॉम डाल्टन आणि मिशेल क्रेपन यांनी हा अहवाल तयार केला आहे. ‘ए नॉर्मल न्यूक्लिअर पाकिस्तान’ शीर्षकाखालील ४८ पानांच्या या अहवालात म्हटले आहे की, आगामी दहा वर्षांत पाकिस्तानकडे ३५० हून अधिक अणुबॉम्ब असतील. अमेरिका व रशिया या देशानंतर अण्वस्त्रांचा हा तिसरा सर्वात मोठा साठा असेल. हा अहवाल उपग्रहांकडून प्राप्त छायाचित्रे व तज्ज्ञांच्या गटांनी केलेल्या विश्लेषणावर आधारित आहे. अहवालानुसार पाकने अण्वस्त्रनिर्मितीसाठी गेल्या दहा वर्षांत चार अणुभट्ट्या बांधल्या आहेत. दरवर्षी ५० किलो प्लुटोनियम उत्पादित करण्याची त्यांची क्षमता आहे. ही क्षमता पाकच्या विद्यमान समृद्ध प्लुटोनियम उत्पादन क्षमतेहून अतिरिक्त आहे. पाकची एकूण क्षमता पाहता तो दरवर्षी २० किंवा त्याहून अधिक अण्वस्त्रांची निर्मिती करू शकतो, असा आमचा तर्क आहे, असे टॉबी डाल्टन यांनी सांगितले. अण्वस्त्र तंत्रज्ञान प्रसाराबाबतचा देशाचा इतिहास व दहशतवादाचा धोका पाहता पाकची अण्वस्त्रांची भूक ही चिंतेची बाब आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.(वृत्तसंस्था)अण्वस्त्र क्षमतेच्या विस्ताराला आवर घालण्याचा सल्ला वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तान व इतर अण्वस्त्रधारी देशांना आपल्या अण्वस्त्र क्षमतेच्या विस्ताराला आवर घालण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही पाकसह सर्व देशांना अण्वस्त्र क्षमता वाढविण्याच्या मनसुब्यांना आवर घालावा, असे आवाहन करतो. येत्या दहा वर्षांत पाक अण्वस्त्रांचा सर्वाधिक साठा असलेला तिसरा देश होणार असल्याच्या अहवालाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. धमकीवरून पाकचे कान उपटलेवॉशिंग्टन : पाकिस्तानने आपण अण्वस्त्रसंपन्न असल्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यास मदत मिळणार नाही, अशा शब्दांत अमेरिकेने पाकचे कान उपटले आहेत. भारत आणि पाकने आपसातील प्रलंबित मुद्दे सकारात्मक चर्चेद्वारे सोडवावेत, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) चर्चा रद्द झाल्यानंतर पाकने आपणही अण्वस्त्रसंपन्न देश असल्याची धमकी भारताला दिली होती.
पाक जगातील तिसरा मोठा अण्वस्त्रधारी देश होणार
By admin | Published: August 29, 2015 12:52 AM