लाहोर - पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये सैन्य तैनातीचा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने सौदी अरेबियाबरोबर द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य करार केला आहे. त्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. सौदी सध्या शेजारच्या येमेनमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये गुंतला आहे. गुरुवारी पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्ये लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि पाकिस्तानातील सौदीच्या राजदूतांमध्ये महत्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने हा निर्णय जाहीर केला.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये सुरक्षा सहकार्य करार झाला आहे. पाकिस्तानी लष्कर सौदीच्या सैन्य दलाला प्रशिक्षण आणि सल्ला देणार आहे. सौदी अरेबियामध्ये आधीपासूनच पाकिस्तानी सैन्याच्या 1 हजार तु़कडया असून त्यांच्याकडे सल्ला देण्याची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी आहे. सौदीला आणखी किती तुकडया पाठवणार त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पण डॉन दैनिकाच्या वृत्तानुसार सैन्याची संपूर्ण ब्रिगेड सौदीला पाठवली जाईल.
येमेनच्या गृहयुद्धात सहभागी झाल्यापासून सौदी अरेबियाने अनेकदा पाकिस्तानकडे अतिरिक्त सैन्य तुकडया पाठवण्याची मागणी केली आहे. आपण कोणत्याही प्रादेशिक लढाईत सहभागी होणार नाही असे सांगत पाकिस्तान आतापर्यंत सौदीची मागणी फेटाळून लावत होता. येमेनमधील लढाई अद्याप थांबलेली नसून तेथील बंडखोर गटांनी सौदीच्या दिशेने अनेकदा क्षेपणास्त्र डागली आहेत.