Pakistan, Nuclear Missile Programme: पाकिस्तान आर्थिक संकटात असून आता कंगाल होण्याच्या वाटेवर आहे, पण तरीही त्यांची मग्रुरी जात नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार म्हणाले की, IMF कडून रखडलेल्या कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी आम्ही आमच्या आण्विक कार्यक्रमाशी कोणतीही तडजोड करणार नाही. पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. महागाई गगनाला भिडत आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF कडून मिळणारे कर्जच पाकिस्तानला मदत करू शकते. असे असले तरी पाकिस्तानचा आडमुठेपणा कायम आहे.
1.1 अब्ज डॉलरच्या कर्जासाठी पाकिस्तान सरकार आणि IMF यांच्यात अद्याप चर्चा झालेली नाही. आयएमएफने अनेक अटी घातल्या आहेत. यापैकी एक न्यूक्लियर कार्यक्रमाशी संबंधित अटदेखील आहे. पण पाकिस्तानचे म्हणणे आहे की काहीही झाले तरी अण्विक कार्यक्रमाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सिनेटर रझा रब्बानी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री इशाक दार म्हणाले, "मी तुम्हाला खात्री देतो की पाकिस्तान आण्विक किंवा क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी कोणतीही तडजोड करणार नाही."
आण्विक कार्यक्रमाशी तडजोड नाही!
कर्ज मिळत नसल्याची ओरड करताना पाकिस्तानने हे प्रकरण IMF वरच ढकलले आहे. दार म्हणाले की, पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम हे देखील IMF सोबतच्या कराराला विलंब होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. पाकिस्तानच्या आण्विक क्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि IMF सोबत जो करार होईल, तो वेबसाइटवर अपलोड केला जाईल.
सिनेटर रझा रब्बानी यांनी सिनेटला संबोधित करताना म्हटले होते की, पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावर दबाव आणता यावा म्हणून या कराराला उशीर केला जात आहे अशी शंका उपस्थित होते. तसेच सरकारने आयएमएफसोबतचा करार करताना आधीही आणि आजही आम्हाला कधीच विश्वासात घेतलेले नाही. या प्रश्नांची उत्तरे देताना दार म्हणाले, "पाकिस्तानकडे कोणत्या श्रेणीची क्षेपणास्त्रे असावीत आणि कोणती अण्वस्त्रे असू शकतात हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो आणि आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण केले पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे."