गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील लोक भुकेने व्याकूळ झाले आहेत. खायला धड अन्न नाही, किंमती गगनाला भिडलेल्या. ते विकत घ्यायला पैसे नाहीत आणि जे परदेशातून दान म्हणून येतेय ते अधिकारी हडप करत आहेत, अशी परिस्थिती आहे. असे असताना आता पाकिस्तानातील लोकांच्या खिशातील उरले सुरले पैसे देखील काढून घेण्याची तयारी सरकार करत आहे.
पाकिस्तानी सरकारने पेट्रोलचा दर आणखी १० रुपयांनी वाढविला आहे. पाकिस्तानात पेट्रोलचा दर वाढून आता 282 रुपये प्रति लीटर झाला आहे. आर्थिक संकटामुळे पाकिस्तानी रुपयाचे अवमुल्यन झाले आहे. यामुळे पाकिस्तानला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. यातच रशियाकडून येणाऱ्या इंधनाला अद्याप वेळ आहे.
डिझेल आणि लाईट डिझेल तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, असे पाकिस्तानी अर्थमंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे. रॉकेलचे दरही 5.78 रुपयांनी वाढून 186.07 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या १५ दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ गरजेची होती, असे दार यांनी म्हटले आहे.
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC+) ने या महिन्याच्या सुरुवातीला उत्पादन कपातीची घोषणा केली. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कर्जबाजारी पाकिस्तान देशाला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून US$ 1.1 अब्ज बेलआउट पॅकेज मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. हा निधी 2019 मध्ये IMF ने मंजूर केलेल्या USD 6.5 बिलियन बेलआउट पॅकेजचा भाग आहे. पाकिस्तान या पैशांचा वापर परदेशी कर्जे फेडण्यासाठी करणार आहे.