लाहोर - प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका सुमबुल खानची अज्ञात आरोपींनी गोळया झाडून हत्या केली. सुमबुलने एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये कार्यक्रम सादर करण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या मर्दन शहरात ही घटना घडली. सुमबुलला एका खासगी पार्टीमध्ये कार्यक्रम सादर करण्याचे निमंत्रण मिळाले होते. पण सुमबुलने कार्यक्रम करण्यास नकार दिला. त्यानंतर अज्ञात आरोपींनी घरात घुसून सुमबुलची हत्या केली.
सुमबुलने नकार दिल्यानंतर तिला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आरोपी तिच्या घरात घुसले. सुमबुलने त्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्यावर गोळया झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी सुमबुलवर अंदाधुंद गोळीबार करुन अक्षरक्ष: तिच्या मृतदेहाची चाळण केली. या प्रकरणातील एका आरोपीचे नाव नईम खट्टर असून तो माजी पोलीस अधिकारी आहे. पोलिसांनी नईम खट्टरला अटक केली असून दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस अधिकारी सईद खान यांनी ही माहिती दिली.
पाकिस्तानात मागच्या काहीवर्षात अनेक महिला कलाकारांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये डान्सर किसमत बैगची हत्या झाली होती. कार्यक्रमावरुन परतलेल्या किसमतवर अकार गोळया झाडण्यात आल्या होत्या. सुमबुलच्या हत्येनंतर पाकिस्तानात मोठया प्रमाणावर असंतोष आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर माहीन खानने या हत्ये विरोधात लोकांना आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
जाणून घ्या सुमबुल खानबद्दल30 ऑगस्ट 1992 साली पाकिस्तानच्या कराची शहरात सुमबुल खानचा जन्म झाला. 25 वर्षीय सुमबुल पुश्तो भाषेतील चित्रपटात अभिनय आणि गायन करत होती. मेरे ख्वाब रेजा रेजा, बुरी औरत, दिल-ए-एबद, राजू रॉकेट या प्रसिद्ध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावरही ती भरपूर अॅक्टीव्ह होती. अभिनयाच्या क्षेत्रातील पाकिस्तनचा उदयोन्मुख चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते.