काबूल : अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्हा, तसेच कुनार प्रांतात पाकिस्तानने शुक्रवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे ३० जण ठार झाले. त्यामध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे.
पाकिस्तानी हवाई दलाच्या २६ विमानांनी काही गावांवर बॉम्ब हल्ले केले. ही माहिती खोस्त प्रांताच्या तालिबानी पोलीसप्रमुखाचे प्रवक्ते मोस्तगफार गेर्ब्ज यांनी दिली. त्याआधी गोर्ब्ज जिल्ह्यात तालिबानी व पाकिस्तानी लष्करामध्ये मस्तेरबेल येथे चकमक उडाली होती.
या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या खोस्त, कुनार प्रांतातील काही नागरिक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी केेलेल्या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले होते. तसेच दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यात आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळेपासून अफगाणी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे पाकने ठरविले होते.