इस्लामाबाद - वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. या वर्षभरात काश्मीर प्रश्न आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानची जगभरात पुरती नाचक्की झाली. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने इम्रान खान यांच्या नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य पुढच्या महिनाभरात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवून अन्य कुणाला तरी या पदावर बसवू शकते. त्याबरोबरच भारतासोबत युद्ध करण्यासाठी सैन्याकडून रणनीती आखण्यात येत असून, सध्या पाकिस्तानी सैन्य त्याची तयारी करत आहे. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची निवड ही पाकिस्तानी सैन्याच्या मर्जीनुसार होते हे उघड सत्य आहे. तिथे सैन्याच्या कलानुसारच पंतप्रधानाची निवड होत असते. तसेच त्याला सैन्याच्या इशाऱ्यांवरच काम करावे लागते. दरम्यान, इम्रान खान हे पाकिस्तानी संसदेमध्ये सर्वमान्य नेते नाहीत. तेथील प्रतिनिधीन अजूनही त्यांना बाहेरचे मानतात. तसेच अशा व्यक्तीने आपल्यावर सत्ता गाजवावी हे त्यांना मान्य नाही. भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला अण्वस्रांच्या वापराची धमकीही देऊन पाहिली, पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. काश्मीरमधील कलम ३७० बाबत पाकिस्तानला जागतिक स्तरावरून मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे इम्रान खान यांचे स्थान धोक्यात आले आहे.
पाकिस्तानी सैन्य करणार इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी, ही आहेत कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 8:37 PM