पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी करण्यात आले आहे. मारगल्ला पोलीस ठाण्याच्या एरिया मॅजिस्ट्रेटने माजी पंतप्रधानांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे. इस्लामाबादच्या (Islamabad) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शुक्रवारी (30 सप्टेंबर) इम्रान खान इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांची माफी मागितली. इम्रान खान यांनी एका प्रचारसभेत महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकी दिली होती. 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांनी त्यांचे सहकारी शाहबाज गिल यांच्याशी झालेल्या वागणुकीबद्दल उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली. शाहबाज गिलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 20 ऑगस्ट रोजी शाहबाज गिल यांच्या (Shahbaz Gill) अटकेविरोधात इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. या रॅलीचे सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण केले. या रॅलीत इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅलीत देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानची शांतता व्यवस्थेला बाधा आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर इस्लामाबादच्या आयजीसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही आहे.
याप्रकरणी इम्रान खान यांच्यावर पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर राज्य संस्थांना धमकावल्याबद्दल दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणी इम्रान खान शुक्रवारी इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याकडे माफी मागण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले. ते म्हणाले, "तुम्हाला न्यायाधीश जेबा चौधरी यांना सांगावे लागेल की इम्रान खान आले होते आणि जर माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांना माफी मागायची आहे".