इस्लामाबाद - महाविद्यालयांमध्ये सर्वच विद्यार्थी जीन्स परिधान करतात. मात्र पाकिस्तानमधील एका विद्यापीठामध्ये जीन्सबाबत एक अजब फर्मान काढलं आहे. विद्यापीठातील मुली आणि शिक्षिकांना टाईट जीन्स घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात प्रवेश करताच विद्यार्थीनींना स्कार्फ म्हणजेच हिजाब घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या खैबरपख्तुनवा प्रांतातील चारसादामधील बाचा खान विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक ड्रेस कोड निश्चित केला आहे.
विद्यापीठाने जारी केलेल्या सर्कुलरनुसार, विद्यापीठात शिकत असलेल्या मुलींना टाईट जीन्स, टी-शर्ट, छोटे कपड़े, मेकअप, दागिने, फॅन्सी पर्स, पारदर्शक कपड़े तसेच हायहिल्स घालण्यास बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या विद्यापीठाने लागू केलेले नियम फक्त विद्यार्थिनींसाठीच नाहीत तर विद्यापीठात शिकवत मुलांसाठीसुद्धा अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. मुलांना निळा, काळ्या रंगाची पॅन्ट, कोट आणि जॅकेट, शॉर्ट, कटऑफ जीन्स, टाईट जीन्स, स्पोर्ट्स शूज, हातांवर बँड घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अभ्यासक्रमामध्ये कुराणचा अभ्यास आणि भाषांतरित केलेल्या कुराणचाही समावेश केला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी भविष्यात चांगले नागरिक म्हणून समोर यावेत, त्यामुळे हे नियम लागू करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. प्राध्यापकांनी नवीन नियम लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच अशा प्रकारचे नियम लागू करणारे पाकिस्तानमधील हे पहिलंच विद्यापीठ नाही तर याआधीही अनेक विद्यापीठांनी अजब नियम लागू केले आहेत.
विद्यापीठाने नव्याने लागू करण्यात येणारे नियम हे विद्यार्थिनींसोबतच विद्यापीठात शिकवत असलेल्या शिक्षिकांनासुद्धा पाळावे लागणार आहेत. तसेच नव्या नियमांनुसार महिला शिक्षिकांना सँडल, इयररिंग्स, जीन्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हा नवा नियम लागू झाल्यानंतर महिला शिक्षिक शॉर्ट स्कर्टसुद्धा घालू शकणार नाहीत. अनेकांनी विद्यापीठातील या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.