पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. या प्रकरणी महिला अत्याचारावर लक्ष वेधणाऱ्या पाकिस्तानच्या महिला ब्लॉगरचा सोशल मीडियावर एक कविता लिहिणं महागात पडलं. या ब्लॉगरला जेलमध्ये जावं लागलं त्यासोबत काही कट्टरपंथी लोकांनी तिच्या घराचीही तोडफोड केली.
पाकव्याप्त काश्मीरात राहणारी ब्लॉगर अस्मा बतूल हिनं महिला अत्याचाराबाबत सलमान हैदर यांची कविता शेअर केली. सोशल मीडियावर तिने लिहिलं की, खुदा, भगवान या ईश्वर, सब मौजूद वे, जब रेप हुआ, फेसबुकशिवाय तिने इन्स्टाग्रामवरही कविता ऐकवली. त्यानंतर अनेक मौलवींनी अस्मानं अल्लाहचा अपमान केल्याचा आरोप लावला. तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास यंत्रणेला भाग पाडले आणि त्यानंतर पोलिसांनी अस्माला अटक केली आहे.
इतकेच नाही तर तिच्या घरी जमावाने हल्ला केला. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यात काही मौलवी दिसत आहेत. अस्माच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित कुटुंबाने सांगितले की, काहींनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप त्यांनी केला. अस्मा बतूल हिच्या समर्थनार्थ काही ब्लॉगरने तिला सोडण्याची मागणी केली आहे.
अस्मा बतूल ही सोशल मीडियात खूप सक्रीय आहे त्यामुळे तिचे फॅन फोलाईंग जास्त आहे. ती नेहमी पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उचलते. अस्मा बतूलला अटक झाल्यापासून मानवाधिकार संघटनेसाठी काम करणाऱ्या गुलालाई यांनीही घटनेचा निषेध केला आहे. ईशानिंदा कायदा हा नवा राजद्रोह कायदा आहे. ज्याचा वापर विरोधात बोलणाऱ्यांना दंड करण्यासाठी केला जातो असा आरोप त्यांनी केला.
ईशानिंदा कायदा काय?
पाकिस्तानात ईशानिंदा कायद्यातील गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. त्याठिकाणी अल्पसंख्याक हिंदू आणि ईसाईंवर ईशानिंदा अंतर्गत खटले चालवले जातात. त्यात अनेकांना ही शिक्षा दिली जाते. पाकिस्तानात कुराण अथवा मोहम्मद पैंगबर यांचा अपमान करणाऱ्यांना आजन्म कारावास ते मृत्यूपर्यंत शिक्षा होऊ शकते. या कायद्या अंतर्गत अस्मा बतूलला अटक करण्यात आली आहे.