इस्लामाबाद - काश्मीरप्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार तोंडघशी पडल्यानंतही पाकिस्तान काही सुधरण्याचे नाव घेत नाही आहे. आता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाकिस्तानच्या एका घोडेस्वाराला काश्मीरप्रश्नाची उबळ आली असून, त्याने आपल्या घोड्याचे नाव आझाद काश्मीर ठेवले आहे. मात्र पाकिस्तानी खेळाडूच्या या कृतीला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार उस्मान खान हा पात्र ठरला आहे. आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी त्याने सरावास सुरुवात केली आहे. तसेच त्याने ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीसाठी आणलेल्या घोड्याला आझाद काश्मीर असे नाव दिले आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. मिळालेल्या माहिनुसार उस्मान खान याने 2019 च्या एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियामधून एक घोडा खरेदी केला होता. या घोड्याचे नाव त्याने आझाद काश्मीर असे ठेवले असून. ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी करण्यासाठी या घोड्यासह तो उतरणार आहे. दरम्यान, याच क्रीडाप्रकारात भारताचा फवाद मिर्झा हासुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी पाकिस्तानी घोडेस्वाराने केलेल्या आगळीकीविरोधात कायदेशीर तक्रार करण्याचा विचार भारतीय ऑलिम्पिक संघटना करत आहे.
पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 10:41 AM