सोशल मीडियाच्या जगात मीम्स (Memes) खूप मोठ्या प्रमाणात चालतात. सुख, दुःख, उत्साह, भीती, आश्चर्य अशा प्रत्येक इमोशनसाठी एकापेक्षा एक आकर्षक मीम्स आहेत. मीम्स अनेकांना आवडतात आणि शेअरही मोठ्या प्रमाणावर होतात. अशाच प्रकारचे एक मीम 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये व्हायरल झाले. पाकिस्तानी संघाचा वर्ल्ड कपमधील एका सामन्यात पराभव झाला होता, तेव्हा एक पाकिस्तानी चाहता खूप निराश झाल्याच कॅमेरामॅनने आपल्या कॅमेरात टीपलं. त्या व्यक्तीची निराशेची पोझ इतकी फेमस झाली की, आजही अनेक ठिकाणी निराशेचे प्रतिक म्हणून त्याचा फोटो दाखवला जातो.
सरीम अख्तर नावाचा पाकिस्तानी चाहता त्या सामन्यानंतर खूप लोकप्रिय झाला. सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सरीम स्टेडियममध्ये ज्या पद्धतीने निराश होऊन उभा होता, ती पोझ जगभर व्हायरल झाली. त्या सामन्यानंतर सरीमचे सोशल मीडियावर फॉलोअर्स तर वाढलेच, पण आता त्याच्या मीम्सला म्यूजियममध्ये जागा मिळाली आहे. हॉन्गकॉन्गच्या मीम्स संग्रहालयात सरीमच्या त्या निराश फोटोला ठेवण्यात आल्याचं स्वतः सरीमनं आपल्या ट्विटरवरुन सांगितलं.
ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, सरीम अख्तरने हॉन्गकॉन्गच्या मीम्स संग्रहालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याची निराशेची पोज दिसत आहे. सोशल मीडियावर सरीमची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच, अनेकजण सरीमला अभिनंदनही करत आहेत.