कराची - लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक देशांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या चीनमध्ये आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. तर, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकांची लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे, भारत सरकारनेही तिसऱ्या अपत्याला सर्व सोयी-सुविधा नाकारल्या आहेत. हम दो हमारे दो... असा नाराच भारताने दिला आहे. अनेकदा लोकसंख्या वाढ आणि नियंत्रण यावरुन वाद विवादही पाहायला मिळतो. आता, पाकिस्तानच्यामंत्री महोदयांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी गजबच उपाय सूचवला आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ख्वाजा आसिफ यांनी वीजेच्या बचतीसंदर्भात कॅबिनेटमधील एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली. त्याचवेळी, सरकारने वाढत असलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बाजारात आणि लग्न कार्यात विजेची बचत व्हावी म्हणून अनुक्रमे ८.३० ते १० वाजेपर्यंत वीज बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. देशातील वीज बंद होणे आणि वाढती लोकसंख्या याचा नेमका काय संबंध हे तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या मंत्रीमहोदयांच्या मतानुसार हे शक्य आहे.
पाकिस्तान गेल्या बऱ्याच दिवसांपासून आर्थिक संकटात आहे. त्यांचे परकीय चलन जवळपास संपुष्टात आले आहे, येथील लोकसंख्येपेक्षा कर्जाची रक्कम मोठी आहे. देशात महागाई आणि गरिबी ही गंभीर समस्या बनत चालली आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, जिथे रात्री ८ वाजता वीज कनेक्शन बंद होते, तिथे मुलं जन्मण्याचे प्रमाण कमी असते, असा दावा मंत्री महोदयांनी केला आहे. विशेष म्हणजे आपली एवढी क्षमता आहे की, रात्री १ वाजताही मार्केट बंद झालं, तरी मुलं जास्त जन्माला घातली जातात, असेही पुढे त्यांनी म्हटले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.