नोबेल पुरस्कार विजेती आणि सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई (Malala Yousafzai) हिनं जगातील सुप्रसिद्ध Apple कंपनीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मलाला हिला खासगी आयुष्यात कार्टुन्स फिल्मची आवड आहे. याच क्षेत्रात अॅपल टीव्हीसोबत काम करण्याची तिची इच्छा आहे. (Pakistani Nobel laureate Malala Yousafzai signs Apple TV deal)
मलाला हिनं गेल्या वर्षी जूनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहान मुलांसाठी ड्रामा, डॉक्युमेंट्री, कॉमेडी आणि अॅक्शन सीरिज बनविण्यासाठी अॅपल कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती खुद्ध मलाला हिनं जाहीर केली आहे.
"कार्टुन्स मुलांना हसायला शिकवतात. दहशतवादाच्या काळात कार्टुन्समुळे आजूबाजूच्या भीषण वास्तवापासून मुलं वाचू शकतात. त्यामुळे यावर काम करण्याची मला संधी मिळत आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते", असं मलाला म्हणाली.
मलाला युसूफझई हिला २०१४ साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला सर्वात कमी वयाची विजेता ठरली होती. ती वयाच्या १५ वर्षांची असताना शाळेत जातेवेळी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळी झाडली होती. या हल्ल्यातून वाचल्यानंतर मलाला युसूफझईनं घाबरुन न जाता मुलींच्या शोषणाविरोधात लढा सुरू केला.