ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 10 - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेजच्या वैमानिकाने थेट कॉकपीटमध्ये चीनी महिलेला प्रवेश देऊन सुरक्षेशी तडजोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आठवडयात टोक्योहून बिजींगला जाणा-या पीआयएच्या विमानात ही घटना घडली. टोक्योहून बिजींगला जाणा-या पीके-853 विमानाचे कॅप्टन शहजाद अझीझ यांनी चीनी महिलेला कॉकपीटमध्ये बसण्यासाठी बोलवले.
जिओ न्यूजने हे वृत्त दिले असून, त्यांचा एक प्रतिनिधीसुद्धा या विमानात होता. हवाई प्रवासाचे जे नियम आहेत त्यानुसार कुठल्याही प्रवाशाला कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसते. पण कॅप्टन शहजाद यांनी नियम धाब्यावर बसवून चीनी महिलेला कॉकपीटमध्ये प्रवेश दिला. जवळपास दोन तास कॉकपीटमध्ये ही महिला बसून होती.
यावेळी वैमानिक आणि एक हवाई अधिकारी कॉकपीटमध्ये होता. हवाई अधिकारी बाहेर आल्यानंतर काहीवेळासाठी ही महिला आणि फक्त वैमानिक दोघेच कॉकपीटमध्ये होते. विमानाने लँडींग केल्यानंतर ती कॉकपीटमधून बाहेर आली. या महिलेला जेव्हा तू वैमानिकाची मैत्रिण किंवा नातेवाईक आहेस का ? म्हणून विचारले तेव्हा तिने उत्तर देण्याचे टाळले.
पीआयएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमान उड्डाणवस्थेत असताना कॉकपीटमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. फक्त एका प्रवाशाला कॉकपीटमध्ये बोलावणे हा सुरक्षेचा गंभीर मुद्दा नाही असे पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. यापूर्वी सुद्धा पीआयएचे वैमानिक आणि क्रू मेंबर्स अशा प्रकारच्या वादात अडकले आहेत.