पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान कधी त्यांच्या कर्तृत्वानं, कधी वादांनी तर कधी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू असल्यापासून ते राजकारणाच्या प्रवासापर्यंत त्यांनी कायम भारताच्या खोड्या काढल्या आहेत. पाकिस्तान अनेक आघाड्यांवर गटांगळ्या खात असताना आपल्या देशातील लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ‘भारत’ हा त्यांच्यासाठी कायम ‘हुकमी एक्का’ राहिला आहे. सध्या पाकिस्तानचं दिवाळं निघालं असताना, खुद्द पाकिस्तानातील जनता आणि विरोधकांकडूनही त्यांना कोंडीत पकडलं जात आहे. एकीकडे पाकिस्तानातील विरोधी पक्ष त्यांच्यावर ‘अविश्वास’ दाखल करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे खुद्द घरातूनही त्यांना ‘अविश्वासा’ला सामोरं जावं लागतं आहे.
इमरान खान यांच वैवाहिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे. इमरान खान यांनी आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. १६ मे १९९५ रोजी ब्रिटिश नागरिक जेमिमा गोल्डस्मिथ बरोबर इमरान खान यांनी पहिला विवाह केला, त्यावेळी इमरान यांचं वय होतं ४२ वर्षे, तर जेमिमा यांचं वय इमरान यांच्या वयाच्या बरोबर निम्मं म्हणजे २१ वर्षे होतं. या दोघांची दोन मुलं आहेत. त्यांच्यातील वैवाहिक मतभेद विकोपाला गेल्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे २२ जून २००४ रोजी दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. याच काळात इमरान खान राजकारणात अधिक सक्रिय झाले होते.
त्यानंतर पत्रकार रेहम खान यांच्याबरोबर इमरान खान यांचं प्रेमप्रकरण चर्चेत होतं. रेहम खान यांचा त्याआधी एजाज रेहमान यांच्याशी १९९३ मध्ये विवाह झाला होता आणि २००५ मध्ये घटस्फोटही ! रेहम यांना आधीची तीन मुलं होती. सहा जानेवारी २०१५ रोजी इमरान खान यांनी स्वत: जाहीर केलं, रेहम आणि मी विवाहबद्ध झालो आहोत. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. केवळ काही महिन्यांत म्हणजे ३० ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांचा घटस्फोट झाला. इमरान खान यांनी त्यानंतर २०१८ मध्ये बुशरा बिबी यांच्याशी तिसरा विवाह केला. त्याआधी बुशरा यांचा १९८९ मध्ये विवाह आणि २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीपासून त्यांना पाच मुलं आहेत. त्यातील दोन मुलींचा विवाह झाला आहे.
पंतप्रधान म्हणून सध्या अत्यंत अडचणीच्या आणि बिकट परिस्थितीतून जात असताना इमरान खान यांना घरच्या आघाडीवरही लढावं लागतं आहे. पाकिस्तानी माध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तांनुसार इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांच्यातील संबंधही सध्या चांगले नाहीत. त्यांच्यात जोरदार भांडण झालं असून बुशरा लाहोर येथे निघून गेल्या आहेत आणि त्यांची जवळची मैत्रीण सानिया शाह यांच्याबरोबर त्या राहात आहेत. इस्लामाबाद येथे इमरान खान यांचं ‘बनी गाला’ हे आलिशान घर आहे. परंतू मतभेदांमुळे बुशरा यांनी घर सोडल्यानंतर इमरान खान यांनीही जणू काही त्याला समर्थनच दिलं आहे. इमरान यांनीही घरातील जवळपास सर्व जुने, वैयक्तिक कर्मचारी, उदाहरणार्थ माळी, स्वयंपाकी, ड्रायव्हर यांना बदलून टाकलं असून नवे कर्मचारी नेमले आहेत.
इमरान खान आणि बुशरा बिबी यांच्यातील वादाला आणखी एक मोठी किनार आहे आणि त्यामुळे इमरान खान यांची राजकीय कारकीर्दही पणाला लागली आहे. माध्यमांच्या म्हणण्यानुसार दोघा पती-पत्नींमधील वादाला गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. बुशरा बिबी यांचे पहिले पती खावर मनेका हे बुशरा यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठेचा वापर करून पंजाब प्रांतात कोट्यवधी रुपयांची कंत्राटं घेऊन ती आपल्या कटुंबाला मिळवून देत आहेत, असा आरोप आहे. पंजाब प्रांतातील अधिकाऱ्यांनी याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बजदार यांच्याकडे तक्रारही केली आहे. बजदार यांनी ही गोष्ट इमरान खान यांना सांगितली आणि तेव्हापासून दोघांच्या नात्यातला तणाव आणखी वाढला. लष्करानेही याबाबत काही प्रकरणांची माहिती इमरान खान यांना दिली. त्यावरुन आधीच वातावरण खूप तापलं असताना आणखी एक प्रकरण घडलं. बुशरा बिबी यांची जवळची मैत्रीण फराह आझमी यांच्या नवऱ्याचे सरकारी खात्यातील ‘संबंध’ आणि करोडोंचा घोटाळा उघडकीस आल्यावर या प्रकरणानं टोक गाठलं. माध्यमांतून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी ते बाहेर फुटलंच. त्यामुळे इमरान खान यांच्यावर विरोधक आणखीच तुटून पडले आहेत.
पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट या विरोधी आघाडीचे नेते मौलाना फजल-उर-रहमान पत्रकार परिषदेत म्हणाले, इमरान खान यांनी देशाची अब्रू धुळीला मिळवली असून आम्ही त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार आहोत.
इमरान-बुशरा बिबीचं नातं विभक्तीकडे..इमरान यांना विरोधकांनी आधीच कोंडीत पकडलं असताना, त्यांची पत्नी बुशरा बिबी यांनीही इमरान यांच्यावर ‘अविश्वास’ व्यक्त केल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानातील नामवंत पत्रकारांनीही या घटनेला पुष्टी देताना हे प्रकरण घटस्फोटाकडे सरकत असल्याचं म्हटलं आहे.