बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग बोलणं एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड महाग पडले आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पाकपतानमधील कल्याणा पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस अधिकारी अरशद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अरशद 2013मध्ये बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या 'शूटआऊट अॅट वडाला' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग 'दो वक्त की रोटी खाता हूं, पाच वक्त की नमाज पढता हूँ...इससे ज्यादा मेरी जरुरत नही और मुझे खरीदने की तेरी औकात नही', हा डायलॉग बोलताना दिसत आहेत.
त्यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. यानंतर पाकपतानमधील जिल्हा पोलीस अधिकारी मारिक महमूद यांनी अरशद यांना तातडीनं निलंबित केले. याप्रकरणी त्यांची चौकशीदेखील करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे एक वृत्त पाकिस्तानातून समोर आले होते. केवळ भारतीय गायकाचं गाणं गुणगुणल्यानं पाकिस्तानी एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्समधील एका महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढण्यात आले होते.