ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २३ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कारवाईचा इशारा दिल्यानंतर धस्तावलेल्या पाकिस्तानने लढाऊ विमानांचा युद्ध सराव सुरु केला आहे. या अशा सरावांमधून पाकिस्तान आपली युद्धाची खुमखुमी दाखवत आहे.
लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हा युद्ध सराव असल्याचा पाकिस्तानचा दावा असला तरी, अशा सरावामुळे उलट लोकांमध्ये भितीच निर्माण होत आहे. गुरुवारी रात्री इस्लामाबादच्या आकाशात पाकिस्तानची एफ-१६ लढाऊ विमाने घिरटया घालू लागल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
जीओ टीव्हीचे पत्रकार हामीद मीर यांनी टि्वटरवरुन एफ-१६ विमानांच्या उड्डाणाची माहिती दिली. आपण जनतेच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने हा युद्ध सराव केल्याचे टि्वट नंतर मीर यांनी केले.
पाकिस्तानी लष्कर दुस-यांना घाबरवण्यासाठी की, स्वत:हा घाबरल्यामुळे असा युद्ध सराव करतेय ते कळत नाहीय असे मीर यांनी एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पाकिस्तानने बुधवारीही अशाच प्रकारचा सराव करुन आपलाच शेअर बाजार पाडला होता.