इस्लामाबाद- पाकिस्तानात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर दोन वर्षांपुर्वी अत्यंत प्राणघातक हल्ला झाला होता. खादिजा सिद्दिकी नावाच्या या मुलीवर चाकूने 23 वेळा वार करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानी न्यायालयाने दिलेल्या धक्कादायक निर्णयात गुन्हेगार मुलास निर्दोष मुक्त करावे असे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. गुन्हेगार हा लाहोरच्या एका प्रसिद्ध वकिलांचा मुलगा आहे.
खादिजा सिद्दिकी ही 23 वर्षांची मुलगी असून ती कायद्याचे शिक्षण घेते. लाहोरमध्ये तिच्या बहिणीच्या शाळेजवळ तिच्यावर एका मुलाने 2016 च्या मे महिन्यात हल्ला केला होता. शाह हुसेन असं त्याचं नाव असून त्याने तिला विवाहासाठी मागणी घातली होती. तो प्रस्ताव नाकारल्याच्या रागामुळेच शाह हुसेन तिच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की खालिजाला मानेवर, हातावर अत्यंत खोल जखमा झाल्या. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बहिणीवरही शाह हुसैनने वार केले होते. अखेरीस त्यांच्या गाडीच्या चालकाने त्या दोघींना वाचवून रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर शाह हुसैनला जुलै 2017मध्ये सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र लाहोर उच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवून त्याला मुक्त करण्याचे आदेश 4 जून रोजी दिल्याने पाकिस्तानभर संतापाची लाट उसळली आहे.
या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसल्याचे खादिजाने सांगितले आहे. त्याने केलेल्या हल्ल्यामुळे आपल्याला रुग्णालयात तीन आठवडे राहावे लागले होते, तसेच पूर्ण बरे होण्यास मोठा काळ गेला, अजूनही आपल्या पाठीत दुखत असल्याचेही तिने सांगितले. खादिजाला आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानात आंदोलन सुरु झाले आहे. वुईआरविथखादिजा नावाने हॅशटॅगही तयार करण्यात आलेला आहे.