इस्लामाबाद : पाकिस्तानातील भारतीय दुतावासाने शनिवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना बोलाविण्यात आले होते. मात्र, काही समाजकंटकांनी त्यांच्या मोबाईलवर धमक्या देत हॉटेलच्या दरवाजावरून माघारी जाण्यास भाग पाडल्याच प्रकार समोर आला आहे. यावर भारतीय दुतावासाने नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवारी सायंकाळी हॉटेल सेरेना येथे भारतीय दुतावासाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी शेकडो लोकांना निमंत्रणही दिले होते. मात्र, पाकिस्तानी एजन्सीनी त्यांच्या फोनवर मास्क्ड म्हणजेच नंबर न दिसणाऱ्या प्रणालीवरून फोन करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच माघारी जाण्यास किंवा इफ्तार पार्टीमध्ये सहभागी न होण्याचे धमकावले होते. यामुळे अनेकजण हॉटेलच्या दारातून माघारी फिरले.
यावर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी नाराजी व्यक्त केली असून झाल्या प्रकाराबद्दल पाहुण्यांची माफीही मागितली आहे. तसेच पाकिस्तानने असा प्रकार करणे राजनैतिक आचरण आणि सभ्य व्यवहाराला शोभून दिसत नाही. ते द्विपक्षीय संबंध सुधारण्यामध्ये बाधा आणत आहेत, असा आरोप केला आहे.