अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या जातात किंवा साखळदंडाने जखडून ठेवले जाते, हे आपल्याला माहीत आहे. पण पाकिस्तानात चक्क एका झाडाला साखळदंडाने जखडून ठेवण्यात आले आहे तेही ११८ वर्षांपासून. ब्रिटिश अधिकाऱ्याने या झाडाला साखळदंडाने बांधण्याची शिक्षा सुनावली होती. लांडी कोटल येथील लष्करी छावणीतील हे झाड १८९८ पासून असे जाडजूड साखळ््यांनी बांधून ठेवण्यात आले आहे. या शिक्षेमागची कथा आश्चर्यचकित करणारी आहे. ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव जेम्स स्क्वॅड होते. तो दारूच्या नशेत झाडाजवळून जात होता. अचानक त्याला हे झाड आपल्यामागोमाग येत असल्याचा भास झाला. त्यामुळे घाबरलेल्या जेम्सने आपल्या माणसांना बोलावून या झाडाला अटक करून साखळ््यांनी बांधण्याचा आदेश दिला. तेव्हापासून हे झाड या अवस्थेत आहे. या झाडावर ‘मी अटकेत आहे’ असा फलक लावण्यात आला आहे. ब्रिटिश जाऊन ७० वर्षे झाली तरी हे झाड अटकेत का हा प्रश्नच आहे. ब्रिटिशांची राज्यवट अतिशय अत्याचारी होती आणि अगदी झाडालाही त्यांनी अटक केली होती, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनाने निर्णय घेतला. झाड एखाद्या कैद्यासारखे उभे असून त्याला बघायला लोक येतात. ते आता पर्यटन स्थळच बनले आहे.
पाकिस्तानातील झाड आहे ११८ वर्षांपासून अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 1:41 AM