इस्लामाबाद- पाकिस्तानात (Pakistan) एका महिलेला ईशनिंदा (Blasphemy) अर्थात इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावरून मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव अनिका अतीक असे आहे. तिच्या विरोधात 2020 मध्ये ईशनिंदा (Blasphemy) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार फारुख हसनातच्या तक्रारीवरून पाकिस्तानच्या रावळपिंडीतील न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला आहे. अनिका अतीक हिच्यावरील तीन आरोप सिद्ध झाले आहेत. तिच्यावर पहिला आरोप - मोहम्मदांचा अवमान, दुसरा आरोप - इस्लामचा अपमान आणि तिसरा आरोप - सायबर कायद्यांचे उल्लंघन, असा होता. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, अनिका आणि फारूख पूर्वी मित्र होते. पण त्यांच्यात कशावरून तरी भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात अनिकाने फारुखला व्हॉट्सअॅपवर (व्हॉट्सअॅप) मोहम्मद यांचा आणि इस्लामचा अवमान करणारे मेसेज पाठवले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आधी फारुखने अनिकाला तिच्या चुकीबद्दल क्षमा मागायला आणि नंतर सर्व मेसेज डिलिट करायला सांगितले होते. मात्र तिने तसे न केल्याने फारुखने तक्रार दाखल केली. तपासात अनिकाविरुद्धची तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर प्रकरण न्यायालयात गेले.
पाकिस्तानात ईशनिंदा कायदा अतिशय कडक आहे. हुकूमशहा जनरल झिया-उल-हकने 1980 च्या दशकात देशात हा कायदा लागू केला होता. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा केल्याच्या संशयावरून लोकांची हत्या केल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. गेल्या वर्षी, अशाच आरोपाच्या संशयावरून एका श्रीलंकन नागरिकाची जमावाने हत्या केली होती. ठार झालेला श्रीलंकन नागरिक सियालकोटमध्ये काम करत होता.