ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २९ - पाकिस्तानी वृत्तसंस्थेत काम करणा-या एका हिंदू पत्रकाराला अन्य सहकारी पत्रकार भेदभावाची वागणूक देत असल्याची घटना समोर आली आहे. साहीब खान ओद असे या पत्रकाराचे नाव असून, धर्माच्या आधारावर एपीपी या वृत्तसंस्थेत त्याला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे.
एक्सप्रेस ट्रीब्युनच्या वृत्तानुसार साहीब खान ओदला मुस्लिम सहका-यांनी वापरलेल्या ग्लासमधून पाणी पिण्यास तसेच त्यांची भांडी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ओद दादू जिल्ह्यातील असून, त्याची आधी इस्लामाबादला रिपोर्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हैदराबादला त्याचे ट्रान्सफर झाले आणि यावर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कराचीमध्ये नियुक्ती करण्यात आली.
ओदचा मुलगा राज कुमार कामानिमित्ताने त्याच्या कार्यालयात आला होता. त्यावेळी ओद हिंदू असल्याचे त्याच्या सहका-यांना समजले. तेव्हापासून ओदला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. माझ्या नावात खान असल्यामुळे सुरुवातीला सगळयांना मी मुस्लिम असल्याचे वाटले होते. पण माझा मुलगा कार्यालयात आल्यानंतर मी हिंदू असल्याचे समजले.
काही सहका-यांना आपत्ती असल्यामुळे ब्युरोचीफने मला माझे पाणी पिण्याचे ग्लास स्वतंत्र ठेवण्यास सांगितले. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असल्याने इफ्तारच्या जेवणाच्यावेळी ओदला सहका-यांसोबत त्याच टेबलावर बसू दिले जात नाही. जेवणासाठी स्वतंत्र ताट,वाटी आणि ग्लास आणण्यास त्याला सांगितले. त्यानुसार ओदची कार्यालयात स्वतंत्र भांडी आहेत.