इस्लामाबाद : पाकिस्तानातील उत्तर वजिरिस्तान भागात अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले असून, त्यात अल काईदाचा पाक प्रमुखही आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाईत शनिवारी अल काईदाचा आंतरराष्ट्रीय नेता ठार झाला होता. त्यापाठोपाठ पाकिस्तान प्रमुखही आज मारला गेल्याने अल काईदाला जबर तडाखा बसला आहे. दरम्यान, अमेरिकेने हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाकच्या ताब्यात दिले आहेत.उमर फरुख असे आज मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो पाकिस्तानच्या अल काईदा संघटनेचा प्रमुख होता. दत्ता खेल जिल्ह्यातील खार तांगी भागात तो मारला गेला. अमेरिकी ड्रोनने एका इमारतीवर दोन क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यात पाच जण ठार झाले असून, इमारत संपूर्ण जमीनदोस्त झाली आहे. उमर उस्ताद ऊर्फ उस्ताद फरुख असे त्याचे नाव असून, तो अफगाण व पाकिस्तानसाठी अल काईदाचा प्रमुख होता. सैन्याच्या कारवाईत शनिवारी ठार झालेला शुक्रीजुमा हा अल काईदाचा आंतरराष्ट्रीय नेता होता. अमेरिकेला न्यूयॉर्क सब वे बॉम्बस्फोट प्रकरणात तो हवा होता. (वृत्तसंस्था)