द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माधार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने आपली बाजू मांडली असून, कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर असल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर केला आहे. याआधी भारताने याप्रकरणात आपले म्हणणे सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडले होते.
पाकिस्तानमधील खासगी वृत्तवाहिनी असलेल्या जियो न्यूजने यासंदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नसल्याचा दावा पाकिस्तानने खोडून काढला आहे. तसेच ते पाकिस्तानमध्ये आराजक माजवण्यासाठी आल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. तसेच कुलभूषण जाधव प्रकरण व्हिएन्ना करारांतर्गत येत नसल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, निवृत्तीनंतर व्यावसायिक कामासाठी ते इराणला गेले असता, तिथे त्यांना पाकिस्तानने अटक केली होती. ते भारतासाठी हेरगिरी करीत असून, त्यांना बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला होता. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्यांच्या फाशीला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर पाकिस्तानने यासंदर्भात १३ डिसेंबर रोजी आपले म्हणणे सादर करावे, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार पाकिस्तानने आज आपली भूमिका मांडली. दरम्यान, कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट होईल; पण तेव्हा तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारीही उपस्थित राहतील. जाधव यांची पत्नी आणि आईला तिथे सुरक्षा पुरवली जाईल.