नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलेला असून दहशतवाद्यांविरोधातपाकिस्तानने ठोस कारवाई करावी अशी मागणी भारताने केली. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. अमेरिकेनेही पाकिस्ताला तंबी देत दहशतवाद संपवा अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी महमूद कुरेशी यांनी बोल्टन यांना दहशतवाद संपवण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती जॉन बोल्टन यांनी ट्विटर वरुन दिली. जॉन बोल्टन यांनी ट्विटरमधून सांगितले की, जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना यांच्या विरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी यासाठी परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कुरेशी यांनी पाकिस्तान दहशतवाद संपविण्यासाठी कठोर कारवाई करत आहे त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून भारताशी वाढलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत आहे.
सध्या भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेच्या तीन दिवस दौ-यावर आहे. त्यामुळे जॉन बोल्टन यांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. विजय गोखले यांनी दौ-याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव कायम राहणार आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो आणि भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या झालेल्या बैठकीत दहशतवाद या विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताने कठोर पावले न उचलावी याबाबत अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणावा अशी मागणी भारताने केली. यावेळी पोम्पियो यांनी अमेरिका दहशतवाद्याच्या मुद्द्यावर नेहमी भारताच्या पाठीशी राहू असं विश्वास दिला.
14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून बालकोट येथे दहशतवादी तळांना टार्गेट केले होते.