लाहोर - आणखी चार दिवसांनी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा नऊ वर्ष पूर्ण होतील. मात्र त्याआधीच या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदची सुटका होणार आहे. पाकिस्तानातील न्यायिक समीक्षा बोर्डाने बुधवारी दहशतवादी आणि जमता-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सईद पुन्हा एकदा मोकाट सुटणार आहे.
सईदची नजरकैद आणखीं तीन महिन्यांनी वाढवण्यासाठी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने केलेली विनंती न्यायिक समीक्षा बोर्डाने फेटाळून लावली. या बोर्डात लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समावेश होता. अन्य कुठल्या प्रकरणात सईदची गरज नसेल तर त्याला सोडून देण्याचे आदेश न्यायिक बोर्डाने दिले आहेत. पाकिस्तान सरकारने त्याला अन्य कुठल्या प्रकरणात अडकवले नाही तर येत्या एक-दोन दिवसात तो मुक्त होईल.
पंजाब प्रांताचे सरकार सईदला दुस-या प्रकरणात अडकवण्याचा विचार करत आहे असे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत सईदला मोकाट सोडणे पाकिस्तानला परवडणारे नाही. सईद सुटला तर पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय टीकेचा सामना करावा लागेल तसेच दहशतवाद्यांना साथ देत असल्याच्या आरोपाचाही सामना करावा लागला. 31 जानेवारीला सईद आणि त्याचे चार साथीदार अब्दुल्लाह उबेद, मलिक झफर, अब्दुल रहमान अबिद आणि काझी काशिफ हुसैन यांना पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याखाली 90 दिवसांसाठी अटक केली होती.
सईदच्या मनात 'रॉ' ची दहशत
भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या मनात 'रॉ' या भारतीय गुप्तचर यंत्रणेची दहशत बसली आहे. रॉ आपल्याला संपवेल अशी भिती त्याला वाटत आहे असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले. भारत सरकार, भारतीय गुप्तचर यंत्रणेचा धाक सईदच्या मनात निर्माण झाला असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही असे खुर्शीद यांनी सांगितले.