ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पाकव्याप्त काश्मीरमधील भीमबीर येथे टेहळणी करणारे भारताचे ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर भारतीय सैन्याने असे कोणतेही ड्रोन पाकमध्ये पाठवले नसल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार भीमबेर येथे भारतीय सैन्याचे ड्रोन टेहळणी करत असल्याचे आढळले. यानंतर पाक सैन्याने कारवाई करत हे ड्रोन पाडले. भारतीय सैन्याचे हे ड्रोन हवाई छायाचित्रणासाठी सोडल्याचा संशय पाकमधील सैन्याने व्यक्त केला आहे. पाकच्या या दाव्याचे भारतीय सैन्याने खंडन केले आहे. भारतीय सैन्याने पाकमध्ये कोणतेही ड्रोन पाठवलेले नाही असे स्पष्टीकरण सैन्याचे कर्नल एस डी गोस्वामी यांनी दिले आहे. त्यामुळे पाकच्या दाव्यावर संशय व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर भारत व पाकमध्ये तणाव निर्माण झाला असून पाकने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.