इस्लामाबाद : आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानचे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनही देऊ शकत नाही. आतापर्यंत सरकारी कर्मचारी दबक्या आवाजात तक्रार करीत होते. आता त्यांचे दु:ख जगासमोर आले आहे. पाकिस्तानच्या सर्बिया दूतावासाच्या अधिकृत ट्विटर पेजवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. त्यात म्हटले की,“महागाईने तिचे सगळे विक्रम मोडले आहेत.
या परिस्थितीत तुम्ही इम्रान खान, आम्ही सरकारी कर्मचारी कोठपर्यंत गप्प बसू शकता, अशी आशा बाळगता? गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही विनावेतन काम करीत आहोत. आमच्या मुलांना त्यांची फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.” या ट्वीटसोबत एक आणखी ट्वीट केले गेले आहे. त्यात इमरान खान यांना टॅग करून म्हटले की, आम्हाला माफ करा, आमच्यासमोर कोणताही पर्याय नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सर्बिया दूतावासाचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे, असे म्हटले.
काही वेळानंतर हा मेसेज डिलिट केला गेला.सोशल मीडियावर असा अंदाज व्यक्त होत आहे की, ती व्यक्ती पाकिस्तान दूतावासात काम करणारा सरकारी अधिकारी आहे. काही लोकांचे म्हणणे असे आहे की, इम्रान खान यांना बदनाम करण्यासाठी कोणी तरी सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले.
संकट मोठे...काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी सार्वजनिक व्यासपीठावर देशात मोठे आर्थिक संकट असल्याचे मान्य केले होते. सरकारकडे कल्याणकारी योजना चालवण्यासाठी पैसा शिल्लक नाही आणि कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासही. महसूल वसुली कमी झाली असून, विदेशी कर्ज वाढत चालले आहे.