- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 9 - मुंबई 26/11 हल्ल्यातील आरोपीविरोधात कोणताच पुरावा न सापडल्याने पाकिस्तानमधील फेडरल तपास यंत्रणेने (एफआयए) आरोपीवर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेतले आहेत. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार फेडरल तपास यंत्रणेने दहशतवाद विरोधी न्यायालयात गुरुवारी चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमध्ये आरोपी सुफियान जाफरचं नाव दोन क्रमांकाच्या रकान्यात लिहिण्यात आले होते. याचा अर्थ त्याच्याविरोधात कोणताच पुरावा सापडला नाही असं चार्जशीटमधून सांगण्यात आलं होतं.
सुफियान जाफरने मुंबई 26/11 हल्ल्यासाठी पैसा पुरवल्याचा आरोप आहे. फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली असून सुफियान जाफरची अजून चौकशी सुरु असल्याचं सांगितलं. फेडरल तपास यंत्रणेला 22 सप्टेंबरला स्वतंत्र माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई 26/11 हल्ला प्रकरणी सुफियान जाफरला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. सुफियान जाफर लष्कर-ए-तयब्बाचा सदस्य होता अशी माहिती फेडरल तपास यंत्रणेच्या कागदपत्रावरुन समोर आली होती. 26/11 हल्ल्यातील संशयितांना जाफरने पैसा पुरवला होता. संशयिताच्या खात्यात जाफरने 14 हजार 800 रुपये जमा केल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं होतं.