इस्लामाबाद : अमेरिकेकडून आठ एफ-१६ विमाने खरेदी करण्याच्या व्यवहाराला आर्थिक कारणास्तव अंतिम स्वरूप देण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. मीडियाच्या एका वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारला ही विमाने खरेदी करण्यासाठी २४ मेपर्यंत पत्र द्यायचे होते; पण ‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार हे दस्तऐवज जारी करण्यात आले नाहीत. एका राजकीय सूत्राचा हवाला देऊन हे वृत्त देण्यात आले आहे.राष्ट्रीय निधीतून या व्यवहाराला पूर्ण पैसे द्यायचे नाहीत, असा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तथापि, अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत जलील अब्बास जिलानी यांनी असा दावा केला आहे की, या व्यवहारातील अंतिम तारीख अद्याप समाप्त झालेली नाही. सुरुवातीला आठ विमाने खरेदीसाठी ७० कोटी डॉलरचा हा व्यवहार आहे. त्यासाठी या रकमेचा काही हिस्सा अमेरिकेच्या विदेशी सैन्य वित्त पोषण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार होता; पण काँग्रेसने या व्यवहारासाठी आर्थिक मदत देण्यास नकार दिला. इस्लामाबादेत अणू कार्यक्रमाच्या हालचालीबाबतही काँग्रेसला शंका आहे. या पार्श्वभूमीवर हा सौदा तूर्तास ठप्प झाला आहे.
पाकिस्तानची एफ-१६ विमान खरेदी बारगळली
By admin | Published: May 29, 2016 12:53 AM